महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ ऑक्टोबर । सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेल्याने आता डिसेंबरमध्ये नव्या कांद्याची आवक होणार आहे. त्यामुळे सुमारे दोन महिने वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दर वाढण्याची शक्यता असून, आता सामान्यांनाही कांदा पुन्हा रडवणार असल्याचे चित्र आहे.
‘राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील हळवी कांद्याचे नुकसान झाले. पूर्वी पावसामुळे कांद्याचे नुकसान होत असे; पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रात प्रामुख्याने नगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणारा कांदा खराब झाला. परिणामी, नवीन हळवी कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. हा कांदा बाजारात येण्यास नवीन वर्ष उजाडणार आहे,’ अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
राज्यात चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात आहे; परंतु परतीच्या पावसामुळे या कांद्याचे सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. त्यामुळे हा कांदा बाजारात आला, तरी त्यामुळे गरज भागणार नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता पोमण यांनी वर्तविली. गणेशोत्सव, नवरात्र, दसऱ्यापर्यंत उपवास, व्रतवैकल्ये असल्याने कांद्याला फारशी मागणी नसते. परंतु, दसऱ्यानंतर कांद्याला मागणी वाढत असल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक होते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.