महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । साई भक्तांसाठी आनंदाची बातमी असून आता साई भक्तांना साईबाबांच्या (Saibaba) समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर समाधीजवळी काचा हटविण्यात आल्या. शिवाय साई भक्तांना द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस प्रवेश देण्यात येणार असल्याचेही संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (devotees of saibaba can directly touch the samadhi of saibaba)
साईबाबांच्या समाधी मंदिरातील समाधीपुढील काचा काढून दर्शन देण्यात यावे अशी मागणी साई भक्तांची होती. साईबाबांच्या समाधीपुढील काच काढून दर्शन घेऊ देणे, जेव्हा गर्दी असते तेव्हा कमी उंचीची काच लावणे, द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, साईबाबांची आरती सुरू असताना मंदिराची परिक्रमा करू देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर प्रवेशद्वारावर येण्या-जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले अधिकचे बॅरिकेड काढून टाकणे, तसेच श्री साईसच्चरित लवकरात लवकर उपलब्ध करून देणे असे महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सीईओ बानायत यांनी दिली.
आपल्या मागण्यांसाठी शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मागण्यांबाबत चर्चा झाली. मंदिराची सुरक्षा आणि प्रशासनाचे कामकाजात बाधा येऊ न देता या मागण्या मान्य करण्याजोग्या होत्या, असे बानायत म्हणाल्या. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मान्य करण्यात येणार असल्याचेही बानायत म्हणाल्या.
या पूर्वी केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच समाधीला स्पर्श करत दर्शन घेता येत होते. सर्वसामान्यांना मात्र काहिसे दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. आता या निर्णयामुळे सर्वच भाविकांना साई समाधीला स्पर्श करता येणार आहे.