कोंबडीनं दिलं साडे तीन इंचांचं अंडं ; पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । सोलापूर शहराजवळ असलेल्या बाळे परिसरात एका देशी कोंबडीने भलं मोठं अंडं दिलं आहे. अंड्याचा आकार पाहून कोंबडीचे मालक दशरथ दंदाडे यांना धक्काच बसला आहे. नेहमी २ सेंटिमीटरचे अंडं देणाऱ्या कोंबडीने साडेतीन इंचाचं अंडं दिलं आहे. हे अंडं पाहण्यासाठी दूरदूरवरून पोल्ट्रीचालक येत आहेत. अधिक चौकशी करत आहेत. कोंबडीचे मालक दशरथ हे देखील विविध ठिकाणी जाऊन कोंबड्याबाबत चौकशी व अभ्यास करत आहेत. यापुढे नेहमी असं मोठं अंडं कशाप्रकारे मिळेल याबाबत अभ्यास केला जात आहे. साधारणपणे एका देशी कोंबडीचं अंडं दीड ते दोन इंचापर्यंत असते. पण सोलापूर बार्शी रोडवर असलेल्या मेंगाणे नगर येथील कोंबडीने साडे तीन इंचाचं अंडं दिलं आहे.

 

देशी कोंबड्या नेहमी दीड ते दोन इंचापर्यंत अंडं देतात. पोल्ट्रीमधील लेयर कोंबड्या दोन ते अडीच इंचापर्यंत अंडं देतात. पण दशरथ दंदाडे यांच्या घरात पाळलेल्या देशी कोंबड्यांमधील एका कोंबडीनं मंगळवारी साडेतीन इंच लांबीचं अंडं दिलं आहे. खुरड्या धून अंडी बाहेर काढताना ही बाब निदर्शनास आली. दशरथ यांनी ताबडतोब घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली व अंडं दाखवलं. एवढं मोठं अंडं पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. शेजारच्या नागरिकांना देखील कुतूहल वाटले. कोंबडीनं दिलेल्या भल्यामोठ्या अंड्याची माहिती वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली. शहरातील अनेक जण जाऊन साडेतीन इंचाचं अंडं पाहत आहेत.

अंड्यात डबल बलक असण्याची शक्यता
मंगळवारपासून भलं मोठं अंडं फ्रीजमध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे. साडे तीन इंचाच्या अंड्यात डबल बलक असावं अशी शक्यता कोंबडीचे मालक दशरथ यांनी वर्तवली. अजूनही ते अंडं फोडलेलं नाही. घरात असलेल्या २० कोंबड्या अशा प्रकारचं मोठं अंडं देऊ शकतात का, याचा अभ्यास करत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिन्यातून १० ते १२ दिवस किंवा कधीकधी १५ दिवस देशी कोंबड्या अंडी देतात. सोलापुरातील विविध पोल्ट्री चालकांशी संपर्क करून अभ्यास सुरू असल्याची माहिती दशरथ दंदाडे यांनी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *