उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; राज्यात पुन्हा नवी समीकरणे?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावही दिला आहे. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर येणार असल्याचं वृत्त आहे. हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असून त्यामुळे राज्यात पुन्हा नवी समीकरणं जुळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

येत्या२० नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलतात आणि एकमेकांना युतीची टाळी देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचितची युती होणार असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते आता एकाच मंचावर येणार असल्याने राज्यातील नव्या समीकरणाची ही नांदी तर नाही ना? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, निवडणूक आल्यावर राजकीय समीकरणे घडतील. इलेक्शन नाही तोपर्यंत असेच चालेल. सध्या तरी युती आणि आघाडी करावी या संदर्भात कुणालाच उत्सुकता नाहीये. मी गेली दहा दिवस मुंबईच्या बाहेर आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राहुल गांधींनी हेरॉल्डचं प्रकरण काय आहे हे लोकांना सांगावं. नाही तर ईडीसमोर गेलेली व्यक्ती राजकीय निर्णय घेऊ शकतात का हा आमचा मुद्दा आहे. त्यांनी हेरॉल्डबाबतचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय लोकं त्यांच्याशी जोडली जाणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *