औरंगाबाद-पुणे एक्स्प्रेसवेचा फायदा:अवघ्या सव्वा तासात नगरकर पुण्यात जाणार; जिल्ह्यात1300 हेक्टर क्षेत्र होणार भूसंपादित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । उत्तर महाराष्ट्रात अर्थात नाशिक विभागीय आयुक्तालयाअंतर्गत नगर जिल्हा येत असला तरी दैनंदिन नगरकरांचा संबंध नाशिक ऐवजी पुण्याशी येतो. शिवाय नगर ते नाशिक चार तासाचे अंतर व नगर ते पुणे सध्याचे अडीच तासाचे अंतर आहे. त्यामुळे नगरकरांना पुणे नेहमीच जवळचे वाटते. भविष्यात नगरकरांचा पुण्याचा प्रवास आणखी वेगात होणार असून, प्रस्तावित औरंगाबाद -नगर -पुणे एक्सप्रेसवेमुळे नगरकर अवघ्या सव्वा तासांत पुण्यात पोहोचणार आहेत. विशेष म्हणजे हा एक्सप्रेसवे नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जाणार आहे. १०० मीटर रुंदीचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे.नगर जिल्ह्यात त्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार १३०० हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार आहे. औरंगाबाद -नगर -पुणे “एक्सप्रेसवे’ हा दहा पदरी आहे. नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे , पारनेर व पाथर्डी या सहा तालुक्यांतून जाणार आहे. नगर जिल्ह्यातील या एक्सप्रेसवेचे अंतर १२४ किलोमीटर असणार आहे. तर पुणे ते औरंगाबाद २७० किलोमीटरचे अंतर असणार आहे.या एक्सप्रेसवेवर वाहनांचा तासी वेग १०० ते १२० असणार आहे. सध्या असलेल्या नगर -औरंगाबाद रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा वेग ६० ते ८० किलोमीटरचा आहे. विशेष म्हणजे सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वेग आणखी मंदावलेला आहे. २०२६ पर्यंत हा एक्सप्रेसवे झाल्यानंतर वाहनांचा वेग आणखी वाढणार आहे. त्यामुळे नगरकरांनाही अवघ्या सव्वा तासांत पुण्यात पोहोचता येणार आहे.

जिल्ह्यात १३०० हेक्टर क्षेत्र होणार भूसंपादित
भूसंपादन अधिकाऱ्यांच्या
नियुक्तीनंतर येईल वेग
औरंगाबाद- नगर- पुणे “एक्सप्रेसवे’ च्या भूसंपादनासाठी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक ३ ऑक्टोबरला झाली. या बैठकीत एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आता बैठकीनंतर महसूल जिल्हा प्रशासन भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहे. नियुक्तीनंतर पुढच्या प्रक्रियेला वेग येईल.

शहरापासून ५५ मीटर अंतरावर एक्सप्रेसवे
नगरकरांना उत्सुकता आहे की प्रस्तावित औरंगाबाद -नगर -पुणे एक्सप्रेसवे कुठून जाणार याची. नगर शहरापासून अर्थात जुन्या नगर -औरंगाबाद रस्त्यापासून ५५ मीटर अंतरापासून हा एक्सप्रेसवे जाणार आहे. नगर शहराबाहेरील केडगाव रस्त्याला जोडून हा एक्सप्रेसवे असणार आहे.त्यामुळे नगरकरांना जुन्या औरंगाबाद -पुणे रोडने जाऊन नव्या एक्सप्रेसवेला लागावे लागणार आहे.
भूसंपादनापूर्वीचे प्राथमिक काम सुरू

नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून औरंगाबाद- नगर -पुणे एक्सप्रेसवे जाणार आहे. १०० मीटर रुंदीचा हा एक्सप्रेस वे राहणार असून अंदाजे १३०० हेक्टरक्षेत्र भूसंपादित केले जाणार आहे. भूसंपादनापूर्वीचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. पुणे विभागाअंतर्गत भूसंपादन प्रक्रिया होणार असल्यामुळे थोडासा विलंब लागत आहे.” मिलिंद वाबळे, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

दृष्टीक्षेपात एक्सप्रेसवे
{ जिल्ह्यातील अंतर : 124 किलोमीटर
{ जिल्ह्यातील तालुके : 6
{ भूसंपादनाचे क्षेत्र : 1300 हेक्टर
{ एक्सप्रेसवेची रुंदी : 100 मिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *