महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. हरहर महादेव चित्रपटाच्या वादात मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. आव्हाड यांच्या अटकेचं वृत्त समजताच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांना अटक झाली आहे, हे पाहून मला ब्रिटीश राज्याचे दिवस आठले. आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
जो एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे मला ब्रिटीश राजचे दिवस आठवतायेत. मी तुम्हाला इथे आवर्जून सांगते की, जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. आव्हाड जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना कळालं वरून दबाव येतोय, वरून म्हणजे कुठून याचं उत्तर माझ्याकडे नाही. सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मात्र त्यांना आता वरून फोन येत आहेत.
पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, जर एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं दाखवत असेल आणि त्याचा विरोध करण्यासाठी एखादा व्यक्ती आंदोलन करत असेल, आपल्या वेदना मांडत असेल तर अशा व्यक्तीच्या अटकेचं मी स्वागतच करते. आव्हाड ज्या कारणासाठी जेलमध्ये गेले त्याबद्दल मला त्यांचा अभिमानच वाटतो.