महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ नोव्हेंबर । नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रिकाम्या हाताने परतलेल्या टीम इंडियाला 2023 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नव्या दमात सादर करण्यासाठी बीसीसीआय नव्या योजनांची अंमलबजावणी करणार आहे. आगामी दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये टीम इंडियाला आक्रमकतेचे तंत्र आणि मंत्र शिकविण्यासाठी महेंद्रसिंग धोनीला नव्या भूमिकेसह संघात घेण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातही धोनीला टीम इंडियाचे मेण्टॉर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय जगज्जेत्या इंग्लिश संघाप्रमाणे टीम इंडियालाही निर्भय बनविण्याचे प्रयत्न करणार आहे. संघात तश्शीच निर्भयता आणण्यासाठी बीसीसीआय ‘पॅप्टन कूल’ धोनीची मदत घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी बीसीसीआय येत्या दिवसांत याबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहे.
गेल्या काही दिवसांत वन डे-टी 20 आणि कसोटीसाठी वेगवेगळे संघ असावेत, असा विचार समोर आला आहे. याबाबत बीसीसीआय गांभीर्याने विचार करीत आहे. त्यानुसार टीम इंडियाचे या क्रिकेटसाठी वेगवेगळे संघ आणि कर्णधार असतील. त्याचबरोबर टीम इंडियाला टी-20 आणि वन डेचे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीलाही संघाचे मुख्य प्रशिक्षक किंवा संचालक बनविण्याची शक्यता आहे. धोनी एकमेव कर्णधार आहे, ज्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगज्जेतेपद मिळवून दिले होते. धोनीप्रमाणेच हार्दिक पांडय़ाबाबतही बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद पांडय़ाकडेच सोपविण्याचे संकेत बीसीसीआयने आधीच दिले आहेत.