हातातील खंजीर बाजूला ठेवा, मगच शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर जा; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ नोव्हेंबर । शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. उद्या स्मृती स्थळावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय असतील. शिवाय शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे यावेळी वाद होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी आजच स्मृती स्थलावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हातातील खंजीर बाजूला ठेवून जा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायचं त्यांना करू द्या. बाळासाहेब ठाकरे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. तरच बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा. कोणीही असतील. त्यांनी हातातील खंजीर बाजूला ठेवूनच बाळासाहेबांना अभिवादन करावं. मी व्यक्तिगत नाव घेत नाही. बाळासाहेब ही एक अशी आत्मा आहे ते सर्व पाहात आहेत. बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालं नाही. हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर संताप व्यक्त केला. ते कपल नाहीये. महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. सोशल मीडियातून ओळखी होतात. पुढे त्याचं रुपांतर भयंकर नात्यात होतं. मी तिच्या वडिलांची मुलाखत वाचत होतो. त्या कुटुंबाचा आक्रोश, वेदना समजून घेतली पाहिजे. कोणत्या धुंदीत आणि गुंगीत ही मुलं जगत आहेत. हे आज परत एकदा कळलं, असं ते म्हणाले.

जे खूनी आणि हत्यारे आहेत. त्यांच्यावर खटलेही चालू नयेत. यांच्यावर राजकारण कोणी करत असेल तर बंद केले पाहिजे. खटले न चालवता परिस्थितीजन्य पुराव्यावरून खुन्यांना फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *