महाराष्ट्र २४- ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – करमाड (ता.औरंगाबाद) शेंद्रा एमआयडीसीच्या नवीन उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी पहाटे हा भीषण अपघात झाला. देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. यात अनेक मजूर अडकले असून आता सरकारने सर्वांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे. जवळ असलेली जमा पुंजी लॉकडाऊनमध्ये संपली. आता खायला आणि गावी जायलाही पैसे नसल्याने अनेक मजूर कुटुंबियांसह पायी प्रवास करीत आहेत.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना गावाची ओढ लागली आहे. मिळेल त्या वाहनाने आणि दिसेल त्या रस्त्याने हे मजूर रस्ता कापित आहेत. रेल्वे रुळावरून चालत जाताना थकल्यावर ‘आता कुठं रेल्वे सुरू आहे’ म्हणून रुळावरच अंग टाकलेल्या मजुरांना झोपेतच मालवाहू रेल्वेने चिरडले. यात १६ मजूर चिरडल्याने जागीच ठार झाले, सुदैवाने तिघांचा जीव वाचला.
रेल्वेने सरळ रस्ता आहे, असे समजून १९ मजूर रुळावरून पायी चालत होते. चालून चालून थकल्यामुळे ते करमाडजवळ रुळावर झोपी गेले. पहाटे गाढ झोपेत असताना मालवाहू रेल्वे आली. मजुरांना झोपेत काहीही समजले नाही. रेल्वेने त्यांना चिरडल्यानंतर एकच आक्रोश झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, ग्रामीण पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळकडे रवाना झाले आहेत.