महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । कॉँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेदरम्यान रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेशन दुकानदारांना ई-पॉज मशिन्सवर सर्व्हर आणि नेटवर्क सुरळीत उपलब्ध नसल्यामुळे दैनंदिन वितरणा दरम्यान येणाऱ्या अडीअडचणी व शासनाची भूमिका याबाबत निवेदन सादर केले.
यात्रेत अटकळी ते केरूर या दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करुन काही प्रश्न शासन दरबारी मांडण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांचा संघटनेच्या वतीने गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या यात्रेदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार माधवराव जवळगावकर यांच्या पुढाकाराने रास्त भाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राहुल गांधी यांच्याशी भेट घडवून आणली.
रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरण वाटप संदर्भात येणार्या अनेक अडचणींबाबत चर्चा करुन त्या दूर करण्याची मागणी केली. यावेळी राहुल गांधी यांनी धावपळीत वेळात वेळ देऊन रास्त भाव धान्य दुकानदारांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि या सोडविण्यासाठी शासन दरबारी मांडू, असे आश्वासन दिले.