महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । घाबरल्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहिला, तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल अनेक वर्षे तुरुंगात राहिले; पण त्यांनी कोणताही माफीनामा लिहून दिला नाही. सावरकरांनी त्या वेळी एक प्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना दगा दिला, असा आराेप करत काँगेस नेते राहुल गांधींनी अकोला जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत माफीनाम्याची प्रत दाखवत सावरकरांबाबतच्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या वेळी त्यांनी यात्रा बंद करून दाखवाच, असे आव्हानही शिंदे-फडणवीस सरकारला दिले. दरम्यान, चोहोबाजूंनी टीका वाढल्याने आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंनी राहुल यांच्या आरोपावर असहमती दर्शवली.
भारत जाेडाे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गुरुवारी दुपारी अकाेला जिल्ह्यातील चान्नी परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र सरकारला भारत जोडो यात्रा रोखावीशी वाटत असेल तर त्यांनी रोखावी. त्यांनी ही यात्रा रोखण्याचा प्रयत्न करून पाहावा; पण कोणाला एखादा विचार मांडायचा असेल तर तो मांडू दिला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांना सावरकर यांच्याविषयी प्रश्न विचारताच, सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. या माफीनाम्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल गांधी यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माजी मंत्री जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी मंत्री बाळासाहेब थाेरात आदी उपस्थित हाेते.
मंत्रिमंडळ बैठकीत राहुल यांचा निषेध
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी एकमुखी निषेध करण्यात आला. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी वाचून दाखवले स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले पत्र
राज्यात आंदोलन, मनसेचा शेगावची सभा उधळण्याचा इशारा राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात राहुल यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांची शेगावातील सभा उधळून लावणार असल्याचे सांगितले.
इंदिरा गांधींच्या पत्रात सावरकरांचा “वीर’ उल्लेख
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना इंदिरा गांधी यांचे पत्र वाचावे लागेल. एक पत्र स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लिहिलेले आहे. इंदिरा गांधी असे लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर आहेत. त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात.
सावरकरांबाबत प्रेमच
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले त्याच्याशी मी सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतिव प्रेम, निष्ठा, आदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केला. हालअपेष्टा सोसल्या. तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची सध्याच्या काळाची आता गरज असल्याचे दिसत आहे.
शिवसेनेची झाली अडचण
राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो पदयात्रेत नांदेडच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. बुधवारच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना वीर सावरकर यांची विचारधारा उद्धव ठाकरे यांनी कशी सोडली याचा पाढा वाचला. आता राहुल गांधी यांनीही सावरकर यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेला काँग्रेस सावरकरांबद्दल बोलत असल्याने ठाकरे यांना पत्रकारांनी याच मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्यानंतर ठाकरेंनीही गांधींच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे सांगितले. याचाच फायदा आता भाजप आणि शिंदे गट घेत आहे, दुसरीकडे काँग्रेससोबत सत्ता भोगलेल्या ठाकरे यांची राहुल यांच्या वक्तव्याने अडचण होताना दिसत आहे.