मी क्राइम रिपोर्टर ; ‘त्या’ गटाची पक्की खबर माझ्याकडे, लवकरच स्फोट ; संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ डिसेंबर । ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकला आले आहेत. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती आणि नाशिकच्या वातावरणाची माहिती घेत आहेत. हा दौरा सुरू असतानाच संजय राऊत यांनी काही गंभीर विधानेही केली आहेत. थेट शिंदे गटात लवकरच स्फोट होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्याकडे याबाबतची पक्की खबर असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

माझा पिंड रिपोर्टरचा आहे. त्यामुळे कुणाच्या डोक्यात काय क्राईम चाललंय हे मला पक्क कळतंय आहे. त्या गटात एकमेकांच्या विरोधात काय चालू आहे याची पक्की खबर मला आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, त्यांनी हिंट देण्यास नकार दिला. हिंट कशाला देऊ. स्फोट होईल तेव्हा कळेलच. त्यांच्यातील ठिणग्या उडत आहेत, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी शिंदे गटातील खासदार हेमंत गोडसे यांचा समाचार घेतला. मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे. आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना, असं आव्हानच त्यांनी दिलं.

शिवसेना कायम आहे. आणि जे गेले ते निवडून येणार नाही. याची आम्हाला खात्री आहे. हा आत्मविश्वास कुठून येतो? आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसते. त्यावरून आत्मविश्वास येतो. सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात हे लोक जात असतात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खात्रीने सांगतो, जे खासदार सोडून गेले त्यांनी स्वत:ची राजकीय कबर खोदली. गेले ते आता. ते प्यारे झाले, असा हल्ला त्यांनी खासदार गोडसेंवर केला. हेमंत गोडसे काय चेहरा होता काय? शिवसेना हाच चेहरा. शिवसेना चार अक्षर हा चेहरा. चार अक्षर ही ताकद आणि लाखो शिवसैनिकांच्या जीवावर खासदार, आमदार निवडून येतात. गट निर्माण करून निवडून येत नाही. खासदार विकले जातात, आमदार विकले जातात. जनता नाही, असंही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *