Zika Patient : पुण्यात पुन्हा झिका, दूसरा रुग्ण आढळल्यामुळे दक्षतेचे आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निदान झालेला झिकाचा हा तिसरा रुग्ण आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्यातील असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात कामासाठी आलेल्या 67 वर्षीय पुरुषाला झिकाचा संसर्ग झाला. हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून 6 नोव्हेंबरला पुण्यात कामासाठी आला होता. त्यापूर्वी 22 ऑक्टोबरला त्याने सूरत येथे प्रवास केला होता. पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. त्यामुळे रुग्णाने वैद्यकीय सल्ल्यासाठी 16 नोव्हेंबरला जहांगीर रुग्णालय गाठले. रुग्णाला झिका झाल्याचे निदान 18 नोव्हेंबरला शहरातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात आले. त्यानंतर रुग्णाचा रक्तनमूना तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. ‘एनआयव्ही’ने 30 नोव्हेंबरला दिलेल्या अहवालात रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे अधोरेखित केले, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी बेलसर येथे झिकाचा रुग्ण आढळला होता. या वर्षी पालघर येथे पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या वर्षातला दुसरा रुग्ण पुण्यात आढळल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये झिकाचे निदान झालेला हा तिसरा रुग्ण आहे.

राज्याचे साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “एडीस या डासापासून डेंगी, चिकुनगुणीया आणि झिका या तिन आजारांचा संसर्ग होतो. आपल्याकडे एडीस डास मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यात डेंगी आणि चिकुनगुणीयाचे रुग्ण आढळतात त्यामुळे झिकाचे रुग्ण आढळणे शक्य आहे. झिका आजाराचे सुमारे 80 टक्के रुग्णांना कोणतेही ठळक लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याची निदान लवकर होत नाही. पालघर, बेलसर आणि आता पुणे या ठिकाणी झिकाचे रुग्ण आढळल्याने या आजाराचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. पण, त्याच्या संसर्गाचे प्रमाण सौम्य आहे.’

महापालिकेने काय केले?

रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्व्हेक्षण, कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. मात्र, परिसरात एडीस डासाची उत्पत्ती आढळलेली नाही. मात्र, खबरदारीच उपाय म्हणून बावधन परिसरात ताप रुग्ण सर्व्हेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्व्हेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *