महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – शहरात रविवारी आणखी २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता ९२ झाली आहे. कोरोनाचा १४ वा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रामनगर-मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
सदर रुग्णावर घाटीत ८ मे पासून उपचार सुरू होते. ९ मे रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने १० मे पासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील हा कोरोनाचा १४ मृत्यु आहे.
.
संभाजीनगर मध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी आणखी २७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यातील आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात नूर कॉलनी येथील दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाने कोरोनावर मात केली. तर मुकुंदवाडी-संजयनगर, भीमनगर-भावसिंगपुरा आणि चिकलठाणा या भागांतील प्रत्येकी एक पुरुष कोरोनामुक्त झाले. या आठही रुग्णांना दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. मनपाच्या केंद्रात दाखल १९ जणही कोरोनामुक्त झाले.