आता ही निवडणूक बिनविरोध होणार ; शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत ही निवडणूक बिनविरोध करण्यावर एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. विधानसभेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होत. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत.

“महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून काँग्रेस पक्षाने एक उमेदवार मागे घेण्याची भूमीका घेतली. मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचा आभारी आहे,” असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भुमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे.

“विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीनं ६ जागा लढवाव्या अशी आमची अपेक्षा होती. परंतु करोनाच्या या संकटात सर्व सदस्यांना मुंबईत आणणं आणि मतदान घडवून आणणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचीही विनंती केली. त्यानंतर आम्ही सर्व बाबींचा विचार करून ५ जागांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

“करोनाचं संकट नसतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार नसते तर कदाचित ही निवडणूक झाली असती. संख्याबळाचं आणि अन्य विचार करता आमच्या सहा जागा येणं शक्य होतं. परंतु एकंदरीत करोनाची परिस्थिती पाहता कोणाला या ठिकाणी मतदानासाठी आणणं शक्य नव्हतं. मुख्यमंत्री करोनाच्या संकटात स्वत: काम करत आहेत. संख्याबळाचाही आम्ही विचार केला त्यानुसार आमच्या वाटाल्या कमी जागा आहेत. आम्ही नंतर सर्व गोष्टींचा विचार केला आणि मुख्यमंत्र्यांनीही यात कोणताही गोंधळ वाढवू नये अशी विनंती केली,” असं थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *