आता पुन्हा मास्क लावा..! गोवर आजार बळावला, लहान मुलांसाठी धोका वाढला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ डिसेंबर । गोवर हा श्वसनप्रक्रियेत अडथळा आणणारा आजार आहे. त्यामुळे राज्यात गोवर उद्रेकाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी पालकांनी मुलांना मास्क घालणे बंधनकारक करायला हवे. त्यामुळे लहान मुलांचे या संसर्गापासून संरक्षण होईल, असे मत राज्याच्या गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी ‘एका वृत्तवाहिनीशी ’ बोलताना व्यक्त केले.

गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची क्षमता अधिक आहे. थुंकीवाटे कोरोनाची साथ पसरण्याचे प्रमाण एकास दोन असे होते. मात्र, हा आजार १२-१४ मुलांना पसरू शकतो. त्यामुळे त्याला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. राज्य बाल कोरोना कृती दलाचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवले म्हणाले की, ‘उद्रेक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतात. त्या ठिकाणच्या मुलांनी मास्क लावला तर नक्कीच त्याचा फायदा होईल.’

डॉ. साळुंखे सांगतात, राज्यभर विशेष लसीकरणाची मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात ज्या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे त्या ठिकाणी पालकांनी मुलांना मास्क लावण्यास सांगितले पाहिजे. त्यामुळे हा आजार त्यांच्या मुलांना होणार नाही.

राज्यात या वर्षी गोवरचे एकूण ११० उद्रेक झालेले असून सर्वात जास्त ४७ उद्रेक मुंबई परिसरात झाले आहे. या परिसरात एकूण ४२८ मुले या आजाराने बाधित झाले असून १२ बालकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण १२ उद्रेक झाले असून येथील ७१ मुले या आजाराने बाधित झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात आतापर्यंत १८ बालकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *