महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ डिसेंबर । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर भाजपपक्षाच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तसेच आणखी महात्मा फुले आणि इतर महापुरुष यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. तर यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यात सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या बंदमध्ये सर्व पक्ष संघटना एकत्रित आल्या आहेत. त्याचबरोबर आज पुण्यात रिक्षा, आणि पुण्यातील पीएमपीएमएल बसही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना जवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे.
दरम्यान पुणे बंद आणि हा मुकमोर्चा यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.