बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार?:मनसेचा सुषमा अधारेंना सवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत. आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुषमा अंधारे यांना केला आहे.

सुषमा अंधारे यांचे वारकरी संप्रदायावर टीका करतानाचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे अडचणीत सापडल्या आहेत. त्यावर माझे ठाकरे गटात येण्यापूर्वीचे ते व्हिडिओ आहेत. तरीही माझे चुकत आहे, असे वारकऱ्यांना वाटत असेल तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही, असे स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिले आहे. मात्र, आता मनसेनेही पुन्हा जुन्या व्हिडिओंवरून सुषमा अंधारेंना लक्ष्य केले आहे.

वारकरी परंपरेचा अपमान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते व सचिव योगेश खैरे म्हणाले की, संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आहे. आक्षेपार्ह हावभाव आणि हीन वक्तव्य करत या परंपरेचा तुम्ही अपमान केला होता. पण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संतांच्या शिकवणुकीनुसार वारकरी संप्रदायाने केलेल्या प्रहारामुळे तुम्ही माफी मागितलीत. पण तीही तोडकी मोडकीच होती. ती मान्य करायची की नाही हे संप्रदायच ठरवेल.

भावना, आस्थांची टिंगल

सुषमा अंधारेंना उद्देशून योगेश खैरे म्हणाले की, हिंदू देवता, हिंदू परंपरा, वंदनीय बाळासाहेब यांच्याबाबत सुद्धा तुम्ही अशीच भाषा वापरली आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण, हनुमान या देवता असतील किंवा नवरात्री सारखे हिंदू धार्मिक सण ज्यात महिला भगिनींच्या भावना आणि आस्था गुंतल्या आहेत त्याचाही तुम्ही टिंगल टवाळी करत अपमान केला. वंदनीय बाळासाहेबांबाबत ‘म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे ?’ असं अपमानस्पद वक्तव्य सुद्धा केलं होतं. त्यामुळे आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची तुम्ही माफी मागणार आहात का नाही?

नाक घासून माफी मागायला हवी

योगेश खैरे म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची तर तुम्ही त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागायला पाहिजे. ती कधी मागणार? खरंतर अशी माफी मागण्यासाठी शिवसैनिक आपल्या नेतृत्वाकडे आग्रह का धरत नाहीत याचंच आश्चर्य वाटतं. ‘मी एकदा केलेलं वक्तव्य परत माघारी घेत नाहीत’ असं आपण म्हणाल्याचं ऐकण्यात आलं होतं. पण, तरीही अशा अपमानस्पद, भावना दुखावणाऱ्या, हीन वक्तव्यांची आपण माफी मागितलीच पाहिजे. तोडकी मोडकी नव्हे तर खुल्या मनाने माफी कधी मागताय ते सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *