महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ डिसेंबर । देशात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका (cold Weather) चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही (maharashtra) तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, आज सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे. वायव्य मैदानी भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीमध्ये जास्त आर्द्रता असणार आहे. त्याचा परिणाम हवामानावर दिसून येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
या भागात दाट धुके पडण्याची शक्यता
देशातील विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज (25 डिसेंबर) पहाटे हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आसाम आणि त्रिपुरामध्ये आणखी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये 25 आणि 26 डिसेंबर रोजी दिवसा आणि रात्री धुके कमी होईल. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पारा घसरला
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी वाढली आहे. मुंबईतही (Mumbai) थंडी वाढली आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत.
कसा असेल तापमानाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस पूर्व भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ होईल. वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. त्यानंतर फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवसात मध्य प्रदेशातील किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे.