महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ डिसेंबर । डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून गेल्या 1086 दिवसांपासून कसोटीत शतक आले नव्हते. वॉर्नर संपला असे वाटत होते. याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधारपदावरील त्याच्या बॅनबाबत दुटप्पी भूमिका घेत त्याचे खच्चीकरण केले. मात्र झुंजार वॉर्नरने या सर्वाना एका खास कसोटीत चोख प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी बॉक्सिंग डेला सुरू झाली. ही खास डे नाईट कसोटी डेव्हिड वॉर्नरची 100 वी कसोटी होती. त्यात डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी करत मोठा धमाका केला.
डेव्हिड वॉर्नर आपल्या शंभराव्या कसोटीत शतकी खेळी करणारा 10 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला. याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100 व्या वनडे सामन्यात देखील शतकी खेळी केली होती. त्यामुळे क्रिकेट इतिहासात आपल्या 100 व्या वनडे आणि 100 व्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील फक्त दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनेज यांनीच हा कारनामा केला होता. आता त्यांच्या सोबत डेव्हिड वॉर्नरचे नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे. (Sports Latest News)
डेव्हिड वॉर्नरने 6 जानेवारी 2020 मध्ये आपले शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर कोरोनाची वैश्विक महामारी सुरू झाली होती. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून कसोटी शतक येण्याला 1086 दिवस लागले. अखेर त्याने बॉक्सिंग डेला हा दुष्काळ संपवला. या शतकामुळे संपूर्ण वॉर्नर परिवार आनंदाने नाचू लागले होते. वॉर्नरची पत्नी कँडिस आपल्या मुलींसह वॉर्नरने आपले सिग्नेचर सेलिब्रेशन केल्यावर आनंदाने उड्या मारत होते.