महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । आजचा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. आज काही स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन नाही, तरीही आजचा दिवस एकदम खास आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण आजच्याच दिवशी जेव्हा आपण पुर्णपणे स्वातंत्र्यही झालो नव्हतो. तेव्हा आपल्याला अभिमान वाटेल अशी एक घटना घडली होती. ती काय होती आणि नक्की 30 डिसेंबरला काय घडले होते, हे पाहुयात.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 मध्ये हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण, आपल्या देशाचा तिरंगा जो आपल्या एकतेचे प्रतिक आहे, तो 1943 मध्ये पहिल्यांदा पोर्ट ब्लेअरमध्ये आजच्याच दिवशी फडकला होता. ही किमया केली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. तो ध्वज होता आझाद हिंद फौजेचा होता.
आझाद हिंद फौज ची स्थापना रासबिहारी बोस यांनी 1942 मध्ये जपानमध्ये केली होती. जपानमध्ये कैद झालेल्या भारतीय सैनिकांचा या फौजेत समावेश करण्यात आला होता. पुढे ब्रह्मदेश आणि मलाया येथील भारतीय स्वयंसेवकांनाही या सैन्यात भरती करण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताने ब्रिटनच्या बाजूने लढू नये, अशी नेताजींची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी ब्रिटीशांचा तीव्र निषेध केला. त्यांचे बोलणे इंग्रजांना आवडले नाही त्यामूळे नेताजींना इंग्रजांनी तुरुंगात टाकले. तुरुंगात असताना नेताजींनी उपोषण केले, त्यानंतर इंग्रजांनी नेताजींना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
यानंतर नेताजींची भारतातून जर्मनीला पळ काढला. आणि तेथे युद्धाचे प्रशिक्षण घेतले. नेताजी जर्मनीत असताना त्यांना आझाद हिंद फौजेचे संस्थापक रासबिहारी बोस यांनी जपानला आमंत्रित केले. ४ जुलै १९४३ रोजी एका समारंभात रासबिहारी यांनी आझाद हिंद फौजेची कमान सुभाष यांच्याकडे सोपवली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विश्वास होता की जपानच्या मदतीने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच ते दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याला साथ देत होते. जपानही नेताजींना स्वातंत्र्यलढ्यात साथ देत होते. युद्धात इंग्रजांवर विजय मिळवून जपानने अंदमान-निकोबार बेटांवर ताबा मिळवला होता.
21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केले. नेताजींचे जपानी लोकांशी असलेले संबंध अतिशय खास होते. म्हणूनच त्यांनी 7 नोव्हेंबर 1943 रोजी अंदमान-निकोबार बेटे नेताजींच्या सरकारकडे सुपूर्द केली. त्यामूळेच सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पहिल्यांदा अंदमान-निकोबारच्या भूमीवर ध्वज फडकवला होता.