महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । सकाळी उठल्यानंतर अनेक जण गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. तहान भागविण्याबरोबर या पाण्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचा त्यांचा विश्वास आहे. परंतु काही जण याबाबत साशंक आहेत.
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा सुधारते. बद्धाकोष्टतेची समस्याही दूर होते.तर, काही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गरम आणि सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फारसा फरक नाही. परंतु सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे हे आरोग्यासाठी नक्कीच लाभदायी आहे.रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोज सकाळी पाणी पिण्याची सवय ठेवल्यास गॅस आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो. शरीरातून विषारी पदार्थदेखील काढून टाकले जातात.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने भूकही वाढते. यामुळे तुम्हाला सकाळचा नाश्ता करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि पोटभर नाश्ता केल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. थकवाही वाटत नाही.
जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. वास्तविक, शरीरात पुरेसे पाणी नसल्यामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि रोज सकाळी एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा.कोमट पाणी प्यायल्याने त्वचेला तेज येते. शरीरात विषारी पदार्थ जास्त असल्यास त्वचेवर डाग पडतात आणि त्वचेची चमक कमी होते. रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने डाग दूर होण्यास मदत होते.