महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ जानेवारी । वातावरणातील बदलामुळे राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. पण आता हीच गुलाबी थंडी बोचरी होणार आहे. कारण, आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने(IMD Pune Weather) महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा (Cold Wave In Maharashtra) इशारा दिला आहे.
सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यातलं तापमान 15 अंशांच्या खाली गेल आहे. मात्र, 5 किंवा 6 जानेवारी नंतर राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. काही ठिकाणी शीतलहरदेखील अनुभवायला मिळेल असा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील बहुतांश ठिकाणी तापमान घट झाली आहे. पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात निफाडमध्ये सर्वात कमी 7.6 अंश सेल्सिअस तापमान आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राज्यातल्या थंडीत वाढ झाली आहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणा-या थंड वा-यानं मुंबईकरांचं नव वर्ष गारेगार झालंय. मुंबईचं किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि माथेरान या दोन शहरांचं किमान तापमान 15 अंशांवर असल्यानं मुंबईकर शहरात माथेरानचा फील घेत आहेत. गुलाबी थंडीनं वर्षाची सुरुवात झालीय. पुढील काही दिवस असंच आल्हाददायक वातावरण कायम राहील असा अंदाज आहे.
पुणे शहराच्या किमान तापमानात घट
पुणे शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झालीय..रविवारी शहराचे किमान तापमान 12.5 अंशांवर आले होते. येत्या तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
निफाडकरांना हुडहुडी भरली
नवीन वर्षात किमान तापमानाचा पारा घसरल्याने निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्ये आज अचानक थंडीत वाढ झाल्याने 7.6 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या गुलाबी थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. धुळ्यात 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, नंदुरबार तापमान 9 अंश सेल्सिअस वर आल आहे. तोरणमाळ परिसरात गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.