अजित पवार घेणार पंढरपूरचा बदला, पुण्यातील पोटनिवडणुकीत भाजपला देणार टक्कर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ जानेवारी । विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसला सुरुंग लावत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. पण आता पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीला जुना हिशेब मोकळा कऱण्याची संधी मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन पोटनिवडणुका ही स्वबळावर लढण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संकेत दिले आहे.

अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पोटनिवडणुकीबद्दल भाष्य केलं. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार आहे.

‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन पोटनिवडणुका अजून आयोगाकडून जाहीर केल्या गेल्या नाही. अजून त्याबद्दल काही निर्णय झाला नाही. याआधी पिंपरीची जागा ही राष्ट्रवादी पुरस्कृत झाली होती. तर पुण्यातली जागा ही काँग्रेसने लढवली होती. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. अनेक बदल झाले आहे. त्यामुळे पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक होईल आणि यामध्ये योग्य तो निर्णय जाहीर करू, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, सोबतच राज्यात महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्न ऐरणीवर आला असताना, पुणे शहराच्या नामांतराचा विषय उकरून काढण योग्य होणार नाही. असं म्हणत पुणे काय आता एकट्या दुक्ट्याचे राहिले नाही. सगळी नावं चांगली आहेत. नामांतरांचा विषय हा संवेदनशील असतो. त्यातही नामांतराचा विषय पुढे येत असताना मूळ पुणेकरांच्या मताचा देखील विचार व्हायला हवा, असं देखील अजित पवार म्हणाले.

विशेष म्हणजे, पंढरपूर आणि अंधेरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. एखाद्या राजकीय नेत्याचे निधन झाल्यावर उमेदवार देऊ नये, अशी राजकीय संस्कृती आजपर्यंत जोपासली गेली. पण, दोन्ही निवडणुकीत भाजपने उमेदवार दिले होते. पण, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपला उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली होती. पण, पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला होता. त्यामुळे आता पुण्यात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *