सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! अंड्यांचे दर आभाळाला भिडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अंड्यांच्या दरानं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. एक डझन अंड्याचा दर तब्बल ९० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २ आठवड्यांत अंड्याच्या दरात डझनामागे १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी मालक-चालकांची चिंता वाढली आहे.

अंधेरी लोखंडवाला आणि वांद्र्यात काल (शनिवारी) डझनभर अंडी ९० रुपये दरानं विकली जात होती. तर बोरिवली, दादर, कुर्ल्यात अंड्यांचा दर ८४ रुपये प्रति डझन होता. सायन, विक्रोळी आणि कांदिवलीत अंड्यांचा दर ७८ ते ८० रुपयांच्या दरम्यान होता. नॅशनल इग कोऑर्डिनेशन कमिटीनुसार, अंड्यांचा किरकोळ दर ७८ रुपये आहे. त्यावर विक्रेते साधारणत: ६ ते १० रुपये आकारतात. शनिवारी घाऊक बाजारात १०० अंड्यांचा दर ६२६ रुपये इतका होता.

थंडीच्या कडाक्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सांगतात. हिवाळ्याच्या दिवसांत अंड्यांच्या दरात वाढ होते. मात्र आता झालेली वाढ विक्रमी असल्याचं मुंबई एग ट्रेडर असोसिएशनचे संचालक आफताब खान म्हणाले. उत्तर भारतात अंड्यांना मोठी मागणी आहे. तिथे थंडीचा कडाका जास्त आहे. त्या भागात अंड्यांची विक्री वाढली आहे, अशी माहिती खान यांनी दिली.

सोया, मका आणि कोंबड्यांचं खाद्य असलेल्या इतर धान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं मुंबई एग ट्रेडर असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू शेवाळे यांनी सांगितलं. माहिमच्या हाऊस ऑफ एग्जमध्ये बॉयलर अंडी ८० रुपयांनी विकली जात आहेत, तर देशी कोंबड्यांची अंडी १४८ रुपये प्रति डझन दरानं विकली जात आहेत, अशी आकडेवारी दुकानाचे मालक अब्दुल कादर मुजावर यांनी दिली. अतिरिक्त खर्चात झालेली वाढ पाहता अंड्यांच्या दरात आणखी वाढ व्हायला हवी, असं मुजावर म्हणाले. वाहतूकदार, कामगार जुन्या दरांप्रमाणे काम करायला तयार होत नाहीत. वाढत्या महागाईचा फटका सगळ्यांनाच बसत आहे, असं त्यांनी सांगितलं. अंड्यांचा दर ९६ ते १०० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज शेवाळे यांनी वर्तवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *