‘वेड’ची दोन आठवड्यांत जोरदार कमाई ; रितेश-जिनिलिया जोडीची बॉक्स ऑफिसवर कमाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा देशमुख यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाने पंधराव्या दिवशी 1.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. दिग्दर्शक म्हणून रितेशचा ‘वेड’ हा पहिलाच चित्रपट आहे आणि जिनिलियाने बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटात कमबॅक केलं आहे. त्यामुळे या जोडीविषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘वेड’ने आतापर्यंत 42.20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 50 कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. ‘वेड’ची कमाई ही 65 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. असं झाल्यास, मराठी चित्रपटाच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटाचं बजेट 15 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल होता. समिक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला. प्रेमात माणूस वेडा होतो की जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात, अशा दोन्ही पद्धतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पहायला मिळतं.

‘वेड’ने दुसऱ्या आठवड्यात नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाचा विक्रम मोडला होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *