“दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने लॉ कॉलेज सुरू करणार, महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटललाही त्यांचं नाव देणार”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ जानेवारी । “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने एक लॉ कॉलेज लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच महापालिकेच्या वतीने एक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, त्या हॉस्पिटललाही लक्ष्मण जगताप यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पिंपरी – चिंचवडमध्ये काल(शनिवार) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित सर्व पक्षीय शोकसभेत ते बोलत होते. याप्रसंगी लक्ष्मण जगताप यांची आठवण सांगताना फडणवीसांचे डोळेही पाणावले होते. या शोकसभेस पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक लॉ कॉलेज व्हावं अशी लक्ष्मणभाऊंची इच्छा होती, म्हणून आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुढाकार घेतला. त्याच्या सगळ्या परवानग्या केल्या आणि आता लक्ष्मणभाऊंच्या नावाने हे लॉ कॉलेज या ठिकाणी आपण निश्चितपणे सुरू करणार आहोत.”

याचसोबत “महेश लांडगे यांनी सूचित केलं आहे, की महानगरपालिकेच्या वतीने एक कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात येत आहे, त्यालाही लक्ष्मणभाऊंचं नाव आपण दिलं पाहिजे. मला असं वाटतं या सगळ्या सूचना अतिशय योग्य प्रकारच्या आहेत. ते तर आपण करूच पण भाऊंचं कार्य, नाव पुढे चालत राहीलं पाहिजे. या करिता अजून काही विचार समोर आले, तर तेही विचार आपण कसे पुढे न्यायचे या संदर्भातील निश्चितपणे प्रयत्न करू.” असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.

अन् फडणवीसांचे डोळे पाणावले –
लक्ष्मण जगताप यांची आठवण सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लक्ष्मण भाऊंच्या आजारपणात राज्यसभेची निवडणूक होती. निवडून येण्याचे गणित आम्ही मांडत होतो, मते कमी होती. अशा परिस्थितीत भाऊंची तब्बेत खालावलेली असल्याने त्यांना आणायच की नाही, असा प्रश्न आमच्यासमोर होता. गिरीश महाजन हे त्यांच्या संपर्कात होते. लक्ष्मण भाऊंनी शंकर जगताप यांच्याकडे निरोप दिला. शंकर जगताप यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आले की भाऊ येणार आहेत. इतकी तब्बेत खालावलेली असताना पीपीईकिट घालून लाईफ सेव्हिंग रुग्णवाहिकेतून पूर्णपणे झोपून ते मुंबईत आले. आम्ही सर्व जण खाली त्यांना घ्यायला उभे होतो. पीपीई किट, मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरले. विरोधी पक्षनेते असताना ते सॅल्युट करून म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी आलो. आजही ती आठवण आली की डोळे भरून येतात. अशी आठवण सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांचे डोळे भरून आले होते.

३ जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *