महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुण्यात कोरोनाने शब्दश: हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. शनिवारच्या (ता.१६) एका दिवसांत २०२ रुग्ण सापडल्याने आजपर्यंतच्या साऱ्या आकड्यांचे उच्चांक मोडले आहेत. कोरोनाचा आवाका एवढ्यावरच थांबला नाहीत तर त्याने दिवसभरात ११ रुग्णांचा जीव घेतलाय. तर दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर आहे. गेली आठवडाभर कोरोनामुक्तांची संख्या न वाढल्याने दिलासा मिळालेले पुणेकर रुग्ण संख्या वाढल्याने हबकले आहेत.
एवढ्या प्रमाणात रुग्ण वाढीचे कारण, महापालिकेने लगेचच स्पष्ट केले असून, दिवसभरात १२०५ नागरिकांची तपासणी झाल्याने २०२ रुग्ण आढळून आले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे.
पुणेकरांचे रोज ज्या आकड्यांकडे सर्वाधिक लक्ष लागलेले असते, तो कोरोनामुक्तांचा आकडा मात्र शनिवारी ६८ पर्यंत खाली आला. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ रुग्ण सापडले होते. त्यानंतर काही दिवस ही संख्या कमी होत, ती शंभरीपर्यंत आणि शंभरीच्या आतच आली. तेव्हाच, कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि ती आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक १९४ रुग्ण बरे झाले होते. त्यामुळे आता रोज नव्या रुग्णांची संख्या कमी होईल आणि घरी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची आशा होती.
मात्र, शनिवारी अचानक नव्या रुग्णांची संख्या २०२ पर्यंत गेली आहे. त्याशिवाय आतापर्यंत १२ तासांत दहा जणांचा मृत्यू झाला; पण दिवसभरात ११ जणांचे बळी गेले आहेत. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात आतापर्यंत सुमारे ३०,२२४ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्धाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३,२९५ जणांना कोरोना झाला आहे. मात्र, १,६९८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, ते आपापल्या घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत १,४१२ रुग्ण असून, त्यात आज सापडलेल्या २०२ रुग्णांचा त्यात समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, १६९ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यापैकीचे ४१ रूग्ण अत्यवस्थ आहेत.