दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी गेलेले १२०० विद्यार्थी महाराष्ट्राच्या दिशेने रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली – विशेष प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकून पडलेले राज्यातील १२०० विद्यार्थी शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. हे सर्वजण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या (UPSC) तयारीसाठी दिल्लीत गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्वजण दिल्लीत अडकून पडले होते. गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु होते.

अखेर आज रात्री विशेष ट्रेनने हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. आंबेडकर स्टेडियम येथे वैद्यकीय चाचणी आटोपल्यानंतर त्यांना ट्रेनमध्ये बसवण्यात आले. यापूर्वी ही विशेष ट्रेन भुसावळपर्यंतच येणार होती. मात्र, अनेक विद्यार्थी मुंबई आणि पुण्यात राहणारे असल्याने रेल्वेचे थांबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यानंतर दिल्लीतील उर्वरित ४०० विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात आणण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 1606 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर ६७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजाराच्या पुढे पोहोचला आहे. तर मृतांची एकूण संख्या 1135 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 524 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 7 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *