लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 2.45 लाख कामगारांची त्यांच्या राज्यात पाठवणी : गृहमंत्री अनिल देशमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे दोन लाख ४५ हजार ६० कामगारांना विशेष श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आले, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.२२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यांतील कुशल-अकुशल कामगार महाराष्ट्रात अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार नियमांचे पालन करून १९१ ट्रेनने २ लाख ४५ हजार ६० कामगार, मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये एकही ट्रेन गेली नव्हती, बिहारमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली.

शनिवारी सकाळी ८.१५ वाजता पश्चिम बंगालसाठी बांद्रा ते हावडा ही पहिली विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यात आली. या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी कमीत कमी १० रेल्वे दररोज सोडण्याची गरज आहे. या परप्रांतीय कामगारांना पाठवण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला आहे. यासाठी एकूण ५४.७० कोटी रुपये त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. राज्यात ३८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगार आहेत. त्यांची जेवणासह सर्व व्यवस्था राज्य शासन करत आहे.

१ मेपासून राज्यातील विविध भागांतून रेल्वे

राज्याच्या विविध भागांतून १ मेपासून १५ मेपर्यंत राज्यातील विविध स्टेशन्सवरून १९१ विशेष श्रमिक रेल्वेद्वारे या सर्वांना पाठवण्यात आले. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (११७), राजस्थान (९), बिहार (२६), कर्नाटक (३), मध्य प्रदेश (२१), जम्मू (२), ओडिशा (७), झारखंड (५), आंध्र प्रदेश (१) या नऊ राज्यांचा समावेश आहे. भिवंडी ६, डहाणू १, कल्याण २, पनवेल १३, ठाणे ५, लोकमान्य टिळक टर्मिनस ३०, सीएसटी ३५, वसई रोड ७, पालघर ३, बोरिवली ९, बांद्रा टर्मिनस १८, अमरावती २, अहमदनगर २, मिरज ४, सातारा ४, पुणे १४, कोल्हापूर ९, नाशिक रोड ४, नंदुरबार ४, भुसावळ १, साईनगर शिर्डी २, जालना २, नागपूर ४, औरंगाबाद ६, नांदेड १, कुर्डूवाडी १, दौंड १ या स्टेशन्सवरून उपरोक्त श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *