महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । भारतीय कुस्ती महासंघाची रविवारी नियोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आली आहे. ऑलिंपियन कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर क्रीडा खात्याने कुस्ती महासंघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. सहसचिव विनोद तोमर यांनाही पदावरून दूर करताना कुस्ती महासंघाने आपले पुढील सर्व उपक्रम तात्काळ थांबवावेत, असा आदेशच क्रीडा खात्याने दिल्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उत्तर प्रदेशमधील गौंडा येथे होणारी मानांकन कुस्ती स्पर्धाही स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे.
कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपावर सविस्तर लेखी खुलासा आपले वडील करणार आहेत, अशी माहिती ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा प्रतीक याने दिली होती; परंतु क्रीडा खात्याने त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्यावर आणि त्यांना तोपर्यंत पदावरून दूर रहाण्याचे आदेश दिल्यानंतर ब्रिजभूषण यांना काढता पाय घ्यावा लागला.
क्रीडा खात्याने समितीच्या सदस्यांची घोषणा अजून केलेली नाही; परंतु महिनाभरात ही समिती आपला अहवाल देईल, असे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण हटाव ही मोहीम लावून धरली आहे. शुक्रवारी त्यांनी पी. टी. उषा अध्यक्ष असलेल्या भारतीय ऑलिंपिक समितीची भेट घेतली आणि ब्रिजभूषण यांच्याविरोधात अन्यायाचा पाढा वाचला.