साध्या सायकलीचं इ-सायकलमध्ये रुपांतर करणारे कोल्हापूरचे सिक्युरिटी गार्ड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । ‘सायकल चालवा आणि प्रदूषण वाचवा’, असा संदेश सायकलिंग करणाऱ्या बहुतांश लोकांकडून दिला जातो. सध्या कोल्हापुरातील एक गृहस्थ आरोग्यासाठी देखील फायदेशीर अशा साध्या सायलकमध्ये नावीन्य आणत आहेत.ते साध्या सायकलीचं रुपांतर इ-सायकलीमध्ये करतात.

सायकलीमुळे सुधारली तब्येत
संजय आनंदराव सांगळे असं या 58 वर्षांच्या सायकल प्रेमी गृहस्थांचं नाव आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत राहणारे संजय हे गेल्या 6 वर्षांपासून एका कंपनीत सिक्युरिटी गार्डचं काम करतात. संजय यांना 2017 साली पहिला हार्ट अटॅक आला होता. या अटॅकनंतर त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट समजली.

संजय यांचे ऱ्हदय हे डाव्या बाजूच्या ऐवजी उजव्या बाजूला आहे. त्यामुळे त्यांना विशेष औषोधोपचार करावे लागले. त्यांनी क्टरांच्या सल्ल्यानुसार सायकल चालवायला सुरुवात केली. ‘सायकल चालवायला सुरूवात केल्यानंतर माझ्या गोळ्या हळू-हळू बंद झाल्या. माझी तब्येत देखील सुधारू लागली,’ अशी माहिती संजय यांनी दिली आहे.

काय आहे खासियत?
सायकलिंगची आवड लागलेल्या संजय यांनी स्वत:च्याच सायकलीला इलेक्ट्रिक बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी त्यांच्या सायकलीला हेडलाईट, ब्रेकलाईट, एफएम रेडिओ, मोबाईल चार्जिंग सॉकेट, इंडिकेटर, हॉर्न अशा बऱ्याच गोष्टी बसवल्या. त्यांची अशी सायकल बघून लोक त्यांच्याकडून स्वतःची सायकल देखील अशी इलेक्ट्रिक बनवून घेऊ लागले.

सिक्युरिटी गार्डची नोकरी करतच त्यांनी त्यांच्या आवडीमुळे आजवर 30 ते 35 सायकलीचे इ सायकल्समध्ये रुपांतर करुन दिले आहे. स्वतःची सायकल त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर संजय किमान 18 हजार रुपयांमध्ये त्यामध्ये इ-सायकलच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देतात. त्यांचं सध्या सायकल फिरतानाच ऑटोमॅटीक चार्ज होणारी बॅटरी सायकलीला बसवण्याचं काम सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बॅटरी काढून घरी चार्ज करावी लागणार नाही, असं संजय यांनी स्पष्ट केलं.

 

कोरोनामध्ये सुरू होते काम
संजय यांना कोरोनामध्ये घरी थांबावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी रात विकल्या गेलेल्या जुन्या सायकल्स फक्त 500 रुपयांमध्ये विकत आणल्या. त्याची डागडुजी केली आणि स्वखर्चाने त्याचं इलेक्ट्रिक सायकलमध्ये रुपांतर केलं. या प्रकारच्या जवळपास 25 सायकली त्यांनी फक्त 5 हजार रुपयांना विकल्या.

‘सायकल चालवणं हे सर्वांच्याच आरोग्यासाठी चांगलं आहे. प्रत्येकानं सायकलकडं आवड म्हणून नाही तर गरज म्हणून पाहिले पाहिजे,’ असं संजय सांगळे यांनी स्वतःच्या तब्येतीचा दाखला देत आवर्जून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *