दुसरा टी-२० सामना : मालिका वाचविण्याचे आव्हान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आज, रविवारी रंगणारा दुसरा सामना जिंकावाच लागेल. पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी झाली. यामुळे दुसऱ्या सामन्यात फलंदाजांवर अधिक जबाबदारी असेल.

भारताच्या गोलंदाजांनाही डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करावा लागेल. पहिल्या सामन्यात डेरील मिचेलने २०व्या षटकात कुटलेल्या २७ धावा निर्णायक ठरल्या होत्या. पहिला सामना भारतीयांनी २१ धावांनी गमावला. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यामुळे भारतीय गोलंदाजीचा कमकुवतपणा स्पष्ट झाला. उमरानने आपल्या एका षटकात १६, तर अर्शदीपने अखेरच्या षटकात २७ धावा मोजल्या. भारताचे प्रमुख फलंदाजही पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले.

धावांचा पाठलाग करताना केवळ १५ धावांमध्ये भारताने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताला दीडशेचा पल्ला पार करता आला.

या कामगिरीनंतरही वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. कारण, कर्णधार हार्दिक पांड्या अर्शदीपला आणखी एक संधी देऊ शकतो. एकदिवसीय सामन्यांची मालिका गाजवलेल्या शुभमन गिलला टी-२० क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवता आलेला नाही. त्याने आतापर्यंत केवळ चार आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असल्याने त्याला दुसऱ्या सामन्यात आणखी एक संधी नक्की मिळेल. भारतीय संघाला चिंता भेडसावत आहे ती ईशान किशन आणि अष्टपैलू दीपक हुडा यांच्या हरपलेल्या फॉर्मची. बांगलादेशविरुद्ध गेल्या वर्षी झळकावलेल्या एकदिवसीय द्विशतकानंतर किशनला आपल्या लौकिकानुसार फलंदाजी करता आलेली नाही. टी-२० मध्ये किशनने अखेरचे अर्धशतक गेल्यावर्षी १४ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले होते.

दुसरीकडे, आक्रमक फलंदाज म्हणून छाप पाडण्यात हुडालाही अपयश आले आहे. गेल्या १३ सामन्यांमध्ये त्याने केवळ १७.८८च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो केवळ १० चेंडूंत १० धावा काढून परतला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सूर्यकुमार यादव आपल्या लौकिकानुसार शानदार फटकेबाजी करत आहे. परंतु, त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळण्याची आवश्यकता आहे.

किवीही झाले सज्ज
न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करणार. डीवोन कॉन्वे आणि डेरिल मिशेल यांनी पहिल्या सामन्यात आपला दणका दाखवून दिला आहे. तसेच, एकदिवसीय मालिकेत गाजलेल्या मायकेल ब्रेसवेलही आपल्या अष्टपैलू खेळाने दुसरा सामना संघाला जिंकवून देण्यास सज्ज झाला आहे. याशिवाय मिचेल सँटनर, लोकी फर्ग्युसन हे अनुभवी खेळाडू पहिल्या सामन्यातील चुका टाळून नव्या दमाने भारताला झुंजवण्याचा प्रयत्न करतील.

भारत
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

न्यूझीलंड
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलेन, डीवोन कॉन्वे , ग्लेन फिलिप्स, डेन क्लीवर, मार्क चॅपमेन, मायकेल ब्रेसवेल, डेरिल मिशेल, मायकेल रिपन, लोकी फर्ग्युसन, ईश सोढी, ब्लेयर टिकनेर, जेकब डफी, हेन्री शिपले आणि बेन लिस्टर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *