महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – : राज्यात कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. सदर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अनुज्ञप्तीधारकांविरोधात जिल्हाधिकारी यांना अवैधपणे मद्यविक्री करीत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. व्ही पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर अनुज्ञप्त्यांचे सखोल निरीक्षण केले.
आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या नियमभंग प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज 18 मे 2020 रोजी सदर प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारीत करून मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये 15 अनुज्ञप्त्या अर्थात मद्य विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. तसेच पाच प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची असल्यामुळे या प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आलेला आहे, असे अधिक्षक बा. वि पठारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.