कसब्यात रासनेंसमोर धंगेकरांचे कडवे आव्हान ; धंगेकर कसब्याचा इतिहास बदलणार? वाचा ग्राउंड रिपोर्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशात ही जागा राखण्याचे मोठे आव्हान रासने यांच्यासमोर असणार आहे. कारण त्यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान आहे.

२००२, २०१२, २०१७ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून तर, २०१९-२० ते २०२१-२२ सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांच्यावर भाजपने कसब्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या रासने यांना कसब्यातून उमेदवारी देताना भाजपने लोकांतील कार्यकर्ता हाच निकष ठेऊन उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, कसबा विधानसभा मतदारसंघातील तगडा जनसंपर्क हाच मुख्य निकष ग्राह्य धरत काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी याआधी २००९ आणि २०१४ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत धंगेकर यांना ४६ हजार ८२० इतकी मते मिळाली होती. तर गिरीश बापट यांचा ५४ हजार ९८२ इतकी मते मिळून विजय झाला होता. तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत कसब्यातून धंगेकर यांना २५ हजार ९९८ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे गिरीश बापट यांना कडवी झुंज देणारे रवींद्र धंगेकर यांची पुण्यात ‘जायंट किलर’ अशी ओळख बनली होती.

आता गिरीश बापट यांनी २५ वर्षे कसब्याचे प्रतिनिधित्व केले आणि मुक्ता टिळक यांनी २०१९ पासून कसब्याची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. अशात काँग्रेसकडे गमवण्यासारखे काहीच नाहीये. तर भाजपने मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपला या पोटनिवडणुकीत अंतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो. भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, धीरज घाटे, गणेश बिडकर हे इच्छुक होते. मात्र, भाजपने रासने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, भाजपने कसब्यातून ब्राह्मण समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी होत होती. पण रासने यांची वर्णी लागल्याने भाजपचा पारंपरिक मतदार मनाला जाणारा ब्राह्मण समाज नाराज झाल्याचे चित्र आहे. अशा आशयाचे बॅनरही कसब्यात लागले आहेत.

दुसरीकडे, रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक स्थानिक नेते गैरहजर राहिल्याने पक्षांतर्गत उघड नाराजी दिसत आहे. तर शैलेश टिळक हे देखील नाराज असल्याने याचा फटका भाजपला बसू शकतो.

हेमंत रासने यांना गिरीश बापट यांचा कार्यकर्ता म्हणून पाहिले जाते. उमेदवारी देताना बापट यांच्या मताचा विचार केला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रासने यांच्या मागे बापटांची ताकद उभी आहे. पर्यायाने रासने यांना याचा फायदा होणार असला तरी धंगेकर यांच्या मागेही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद असल्याने कसब्यात जोरदार लढत होणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *