महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । पिंपरीतील जीव औधष निर्माण महामंडळ, प्रतिविष व रक्तजल (हाफकीन) मधील चतुर्थ (Pimpri News) श्रेणीतील कर्मचा-यांची निवासस्थाने अत्यंत धोकादायक झाली आहेत. स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये वसाहत राहण्यात अत्यंत धोकादायक असल्याचे महामंडळाला कळविले आहे. त्यामुळे 96 कुटुबियांना नवीन निवासस्थाने बांधून देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.
याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे. त्यात बनसोडे यांनी म्हटले आहे की, हाफकीनमधील कर्मचा-यांची निवासस्थाने अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. त्याची कधीही पडझड होऊन तिथे राहत असलेल्या कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुबियांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. देशाचे स्वास्थ उत्तम व अबाधित राखण्यामध्ये हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाचा वाटा मोलाचा आहे. ही संस्था वाढविण्यात कर्मचा-यांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे.
चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे अत्यंत तोकड्या वेतनावर कंपनीत काम करत आहेत. त्यांना निवासस्थान उपलब्ध असल्याने आजतागायत त्यांचे कौटुबिंक आयुष्य सुरळीत सुरु आहे. कंपनीत जवळपास 96 कुटुंब राहत आहेत. मात्र ते राहत असलेले निवासस्थान हे अंदाजे 50 वर्षे जुनी व मोडकळीस आली आहेत. 10 जानेवारी 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले. त्यात निवासस्थान A, B, C, D, E, F, G आणि H या कर्मचारी वसाहती राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत.
या वसाहतीचा वापर करण्यात येवू नये, रहिवाशांनी (Pimpri News) निवासस्थाने त्वरित रिकामी करावी, असे महामंडळाला कळविण्यात आले आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करुन 96 कुटुबांना नवीन निवासस्थाने बांधून देण्यात यावीत. दरम्यानच्या काळात त्यांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी निवेदनातून केली आहे. त्यावर मंत्री राठोड यांनी कार्यवाही करण्याची सूचना प्रधान सचिवांना दिली आहे.