महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. त्यांना रोज आव्हान देणारे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आदित्य ठाकरे यांनी आज चक्क शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाही त्यांनी टोलेबाजी केली. आमच्या पाठित खंजीर खुपसला, तरी आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत.
आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बिडकीन येथे बोलत होते.
काय म्हणाले आदित्य?
आदित्य ठाकरे आज बिडकीन येथे आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना काही आव्हान देणार नाही. जगात सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही कोणाचेही वाईट बघत नाही. ती आमची सवय नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला, वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात.