महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । अजय विघे | येवला तालुक्यातील सायगाव येथून चोरीस गेलेला नवा ट्रॅक्टर व रोटर महिन्याभरात परत मिळाले आहेत.सायगाव येथील शेतकरी अॅड. राहुल भालेराव व विशाल भालेराव यांच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर व रोटर गेल्या जानेवारी महिन्यात घरापुढे लावलेला असताना चोरी गेला होता. या संदर्भात विशाल भालेराव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस या प्रकरणी तपास करत होते. मात्र, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी निफाड पोलिस ठाण्यास कार्यरत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे माजी कर्मचारी रावसाहेब कांबळे यांना या प्रकरणाचा छडा लावण्याचा विशेष आदेश दिले. त्यानुसार, निफाड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कांबळे यांनी आपल्या नेटवर्कचा वापर करून चोरट्याचा माग काढला. हा चोरटा नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील असल्याचे कळाले. कांबळे यांनी चोरट्याला ताब्यात घेत, पोलिसी खाक्या दाखविताच चोरट्याने रोटर काढून दिले, तर ट्रॅक्टर परळी वैजनाथ या ठिकाणी विकला असल्याचे सांगितले. कांबळे यांनी परळी वैजनाथ गाठत संवेदनशील भागातून ट्रॅक्टर जप्त केला. आरोपी किशोर भिका पवार (२९) रा. कळवण जि.नाशिक याच्यासह ट्रॅक्टर, रोटर तालुका पोलिसात जमा केले. या प्रकरणी अधिक तपास आता तालका पोलिस करत आहेत.