महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । जिथे जगभरातील लोक तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंपाच्या रूपात आलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी हात पुढे करत आहेत, तेथे काही लोक आहेत जे भूकंपग्रस्तांमध्ये लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर लूट केल्याचा आरोप असलेल्या 48 जणांना अटक करण्यात आली आहे.
6 फेब्रुवारी रोजी झालेल्या 7.8-रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर झालेल्या लूटमारीच्या तपासाचा भाग म्हणून आठ वेगवेगळ्या प्रांतांमध्ये संशयितांना अटक करण्यात आल्याचे अनादोलु वृत्तसंस्थेने सांगितले. अनादोलुच्या म्हणण्यानुसार, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या या भूकंपामुळे आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Turkey arrests 48 people over looting after the devastating earthquakes, reports AFP News Agency citing state media
— ANI (@ANI) February 11, 2023
आरोपींनी कोसळलेल्या इमारतीं लूटपाट केल्याचा तसेच खोटे कॉल करून पीडितांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुरक्षा पथकांनी 11,000 अमेरिकी डॉलर, 70,000 तुर्की लिरा, 20 सेलफोन, आठ लॅपटॉप, पाच घरगुती उपकरणे, सहा बंदुका आणि तीन रायफल तसेच दागिने आणि बँक कार्ड जप्त केले, असे वृत्तसंस्थेने सुरक्षा कर्मचार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. बचावकार्य कर्मचारी असल्याचा दाव करणाऱ्या दोघांना सहा ट्रक लुटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या ट्रकमध्ये भूकंपग्रस्तांसाठीचे खाद्यपदार्थ होते.
इस्तंबूलच्या बेकोज जिल्ह्यात भूकंपग्रस्तांना फोन करून फसवणूक केल्याप्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली. वृत्तानुसार, संशयितांनी स्वतःची ओळख दूरसंचार कर्मचारी अशी सांगितली आणि पीडितांना त्यांची वैयक्तिक बँकिंग माहिती दिली तर त्यांना मदत केली जाईल असे आश्वासन देत फसवणूक केली.
तुर्कस्तानमध्ये 11 फेब्रुवारी भूकंपानंतर सलग सहाव्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी भूकंपग्रस्त भागात मदत पाठवली आहे. Hatay मध्ये, भारतीय लष्कराने शाळेच्या इमारतीत एक रुग्णालय उभारले आहे, जिथे पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. भारतीय लष्कराने आपल्या मोहिमेला ‘ऑपरेशन दोस्त’ असे नाव दिले आहे.