तर्काच्या गंजलेल्या चाळण्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ फेब्रुवारी । जन्मतः प्रत्येक मनुष्याला निसर्गाने मेंदू प्रदान केलेला असतो. गरीब,श्रीमंत किंवा जात.धर्म बघून जगात कधीच कुणाचा मेंदू ,बुद्धी कमीजास्त नसते. निसर्ग कुणाचाही वशिला मान्य करीत नाही ,सर्वाना सर्वकाही सारखेच वाटप करीत असतो. पुढे त्याचा वापर आणि विकास जसा होतो तशी व्यक्ती घडत जाते. स्थान,काळ आणि सामाजिक परिपोषण यात मोलाची भूमिका बजेट असते. आपल्या जीवनात किंवा भवताल घडणाऱ्या घटना चांगल्या की वाईट हे ठरवणारी तर्काची चाळणी प्रत्येकाच्या मेंदूत असते. त्याच्या आधारावरच मानवी जीवन अवलंबून असते. मेंदूतील हा तर्काचा कप्पा क्रांतिकारी आणि बंडखोर असतो ,त्यामुळेच त्याचा वापर होऊ नये याचा आग्रह असणाऱ्या यंत्रणा आपल्या अवतीभोवती सतत कार्यरत असतात. स्वतःच्या मेंदूमधील तर्क वापरण्याची सवय संस्कार आणि घरातले वातावरण यावर अवलंबून असते ,ज्या घरात मुलांना त्याचा वापर करण्याची मुभा असते ती मुले पुढे स्वतंत्र विचारांचे नागरिक म्हणून उदयास येतात इतर सगळी प्रजा असते.

तर्क कुणाचेही वैचारिक नेतृत्व स्वीकारीत नाही. त्यामुळे मुलांनी आपली बुद्धी पाजळु नये असाच बहुतांश पालकांचा आग्रह असतो.” मी सांगतो तेवढे कर,उगाच अक्कल पाजळु नकोस.” अशी तंबीच देताना पालक आढळतात त्यामागे मुले हाताबाहेर जाऊ नये अशी भीती असते. बालवयात पालकांच्या प्रभावात येऊन मेंदूतील तर्क वापरणे बंद झाले की तसेच व्यक्तिमत्व घडत जाते. घरातील वडीलधारी मंडळी म्हणजे त्रिकालज्ञानी ,ते सांगतात तेच खरे हा संस्कार घट्ट होत जातो. पुढे शाळेत गुरुजन आणि समाजात गुरु शिवाय कुणाकडे ज्ञान असू शकत नाही यावर भरोसा पक्का होतो. बालपण,विद्यार्थी दशा आणि तारुण्य उलटून गेले आणि आपण प्रौढ झालो तरी मेंदूतील तर्क वापरण्याचे काम पडत नाही अशावेळी तर्काच्या चाळणीवर श्रद्धा,आस्था,भक्ती किंवा आज्ञाधारकपणाचा गंज चढलेला असतो. जेव्हा संभ्रम वाढेल तेव्हा कुणाचे तरी मार्गदर्शन घेऊन काम भागून जाण्यामुळे विचारशक्ती कमकुवत होते.

खरे,खोटे जिथून ओळखले जाते त्या भागाचा दीर्घकाळ वापरच झाला नसल्याने त्यासाठी सुद्धा कुणाचा तरी आधार घेण्याची गरज निर्माण होते. तर्काचा आणि व्यक्तीच्या शिक्षणाचा काहीही संबंध असल्याचे समाजात आढळत नाही. परिणामी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी मूर्ख बनणारे,चटकन फसणारे आणि कुणाच्याही नादी लागणाऱ्या शिक्षित समूहाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. गेल्या काही दशकात विज्ञान प्रसार,संशोधने आणि शिक्षण खूप वाढले असले तरी त्याच्या बरोबरीने बौद्धिक गुलामांच्या पिढ्याही वाढत आहेत. जगाच्या समाजजीवनात आणि भारतात काय चालले आहे याचा विचार तर्क वापरणारी कुणी व्यक्ती करते तेव्हा तिला चटकन असंख्य फरक किंवा विरोधाभास लक्षात येतात मात्र तर्क जणू आपल्या मेंदूत नाहीच असा समज असलेल्या कोट्यवधी व्यक्ती लाखोंच्या लोंढ्यात स्वतःला घुसवून कशाच्या तरी मागे लागले आहेत.

मला आठवते ,१९८७ साली जेव्हा पहिल्यांदा भूत,भानामती,मंत्रतंत्र काहीच नसते हे कानावर आले तेव्हा मी पार थिजून गेलो होतो. कारण तोवर सगळ्या धार्मिक मंत्रांवर माझा प्रचंड विश्वास होता. गायत्री मंत्र,ओम नमः शिवाय किंवा रामकृष्णहरी या मंत्रांचा दिवसातून कितीतरी वेळा माझ्या तोंडून उच्चार व्हायचा. सगळ्या धार्मिक पोथ्या,कीर्तने,हरिविजय,पांडवप्रताप,नवनाथ गाथा यांचा मोठा पगडा मेंदूवर होता. तोवर मेंदूतील तर्काचा वापर कधीच केलेला नव्हता. आचार्य रजनीश यांची काही पुस्तके वाचून आणि ८७ नंतर श्याम मानवांची भाषणे ऐकून महाविद्यालयीन जीवनातच मेंदूत असणाऱ्या तर्काचे स्टेशन गाठले आणि जगण्याची गाडी योग्य रुळावर आणण्यात यश मिळवले असे वाटते. वाटते यासाठी म्हणतोय की अनेक धार्मिक,अध्यात्मिक मित्रांच्या नजरेत मी अजूनही भटकतोय,मुक्तीचा मार्ग सापडला नाही असे त्यांना वाटते.

त्याकाळात शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि समाजात बुवा,बाबा,स्वामी,साध्वी,माता यांचे प्रमाण कमी होते. आता प्रगती, शिक्षण, श्रीमंती,समज आणि विज्ञान सगळेच वाढले असताना अध्यात्माची लाट आल्याचे दिसते. एकेका समाजात बुवा,बाबांचे डझनावारी पीक आल्याचे जाणवत आहे आणि नवल म्हणजे या सगळ्यांचे व्यवसाय अतिशय वेगाने वाढत आहेत. एकेका बाबाचे स्वतंत्र संस्थान निर्माण होऊन हजार कोटींच्या वर व्यवसाय गेला आहे. अनुयायांना मोहमाया त्यागण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या बुवा, बाबांचे जगणे पंचतारांकित झाले आहे. देहाला कष्ट देण्याचा उपदेश देणाऱ्या गुरूंचे टोलेजंग आश्रम वातानुकूलित बनले आहेत. ते काहीही असंबद्ध बडबडले तरी त्यातून दिव्यसंदेश काढण्याचे तंत्र अनुयायांनी विकसित केले आहे. अन्नदान,गोपालन आणि सत्संग या त्रिवेणी संगमाने शिक्षित परिवार चेकबुक घेऊन समर्पित होताना दिसत आहेत. मला वाटते एवढे सारे अनर्थ एका अतर्काने केले आहेत. समाजाच्या तर्कबुद्धीवर आभासी भक्तीचा टणक गंज चढला आहे. त्यावर आणखी असंख्य थर निर्माण व्हावेत यासाठी सगळी धार्मिक यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांनी घराघरात त्यांच्या विचारांचे प्रतिनिधी निर्माण केले आहेत. जिथे शक्य नाही तिथे अध्यात्मिक चॅनेल त्यांचे काम करीत आहेत. महिला वर्ग ऊत्तम सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांची तर्काची चाळणी पुरुषप्रधान व्यवस्था आणि धर्माने आधीच काँक्रीटने बुजवून टाकली असल्याने एक शोधायची झाल्यास शंभर स्त्रिया आयत्याच जाळ्यात सापडत आहेत. मुले,पती आणि तिच्या कुटुंबाच्या कल्याणाचे गाजर दाखवले की तिच्याकडून कोणतेही कर्मकांड करून घ्या अश्या अवस्थेत आजची स्त्री उभी असल्याने प्रत्येकाच्या मेंदूतील तर्काची चाळणी काढून घेणारे लोक धर्माचा,पंथाचा किंवा मोक्षाचा शेंद्रा कपडा घेऊन फिरताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या जीवनात चांगले वाईट शोधून काढण्याची तर्काची चाळणी गोठवली,बधिर केली तर कधीतरी तिचे काम सुरु होण्याची आधी आशा होती आता प्रगत तंत्रज्ञान वापरत किंवा फसव्या विज्ञानाचा वापर करीत मेंदूतील हा तर्काचा कप्पाच काढून टाकण्यासाठी सगळा आटापिटा सुरु आहे. लक्षात घ्या जोवर तुम्ही तर्काचा वापर करीत आहात तोवर तुमच्यावर कुणाचीही गुलामी लादली जाणार नाही ,आपल्या माणूसपणाचा बचाव करणारे तर्क हे एकमेव प्रभावी हत्यार आहे ,तेच काढून घेतले तर कुणाच्या तरी आज्ञा पाळणारे रोबोट बनायला वेळ लागणार नाही. बघा,घरातही मुलांना मेंदूतील तर्काच्या चाळणीचा उपयोग शिकवा आणि स्वतःही करायला शिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *