चक्राकार वाहतुकीने पुणेकर वैतागले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात शिवाजीनगर-हिंजेवाडी मेट्रोसोबत दुहेरी उड्डाणपूल बांधण्यासाठी या भागात केलेल्या चक्राकार वाहतुकीचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला आहे. या ठिकाणी दोन-दोन तास रांगेत थांबावे लागत असल्याने वाहनचालकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. चौकात आणि परिसरात मेट्रोचे खांब उभारण्यासाठी पोलिसांनी येथील वाहतूक व्यवस्था चक्राकार पद्धतीची केली. मात्र, पाषाण आणि बाणेर या अरुंद रस्त्यांवर गणेशखिंड आणि सेनापती बापट रस्त्यावरून आलेली सर्व वाहने वळविल्यामुळे अभिमानश्री, बाणेर फाटा, परिहार चौक औंध येथून पुढे जावे लागते आहे.

त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रोचे काम सुमारे वर्षभर चालणार असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसंदर्भात योग्य तो निर्णय न घेतल्यास नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात पर्यायी मार्गावरून वाहतुकीचे नियोजन करतानाच ठिकठिकाणी वाहतूक तात्पुरती थांबविण्याचे नियोजनही करण्याची आवश्यकता आहे. गर्दी लक्षात घेता काही वाहने विद्यापीठ चौकातून औंधच्या दिशेने सोडण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत काही वाहनचालकांनी ’पुढारी’शी बोलताना व्यक्त केले आहे.

एकवेळ बर्म्युडा ट्रँगलचे कोडे सुटेल; पण…
पुणेकर नेहमीच आपल्या खोचक पद्धतीने मत मांडण्यात पटाईत आहेत. मग त्या पुणेरी पाट्या असो की बॅनर. विद्यापीठ चौकातील चक्राकार वाहतूक बदलावर सोशल मीडियावर विविध मते व्यक्त केली जात आहेत. ‘पुणेरी स्पीक्स’ या टि्वटर हँडलवर ‘एकवेळ बर्म्युडा ट्रँगलचे कोडे सुटेल; पण पुणे विद्यापीठ चौकाचे नाही,’ असे खोचक टि्वट करण्यात आले आहे.

पोलिस नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक…
विद्यापीठ चौकात असलेला यू-टर्न चक्राकार वाहतुकीमुळे बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा फेरा घालून जावे लागत आहे. गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चौकात आल्यावर नागरिकांना विद्यापीठात जायचे असेल किंवा औंध रस्त्याला जायचे असेल, तर पाषाण रस्त्याने ग्रामीण पोलिस मुख्यालय किंवा अभिमानश्री चौकातून पुन्हा बाणेर रस्त्याने समोरच असलेल्या विद्यापीठात वळसा घालून जावे लागत आहे. औंधकडे जाणार्‍या स्थानिक नागरिकांचे देखील असेच हाल होत आहेत. विद्यापीठ चौकातून सरळ ब—ेमेन चौक औंधकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक पोलिस व वाहनचालकांत शाब्दिक चकमक होत आहे.

आमदार शिरोळेंची विद्यापीठ चौकात पाहणी
स्थानिक नागरिकांनी येथे होणार्‍या कोंडीबाबत आणि पडणार्‍या वळशाबाबत शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना तक्रार केली होती. त्यामुळे शिरोळे यांनी सोमवारी सायंकाळी विद्यापीठ चौकाची पाहणी केली. येथे नियुक्तीवर असलेले सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

येथून वाहतूक कोंडीला सुरुवात…
शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्त्याने पाषाण, बाणेर, औंधकडे जाताना कृषी महाविद्यालय चौकातूनच वाहतूक कोंडीला सुरुवात होते. तेथून पुढे सूर्यमुखी दत्तमंदिर चौक, आकाशवाणी कॉलनी, नाबार्ड, ई-स्क्वेअर टॉकीजसमोर, सेनापती बापट रस्त्याने येणार्‍या चतु:शृंगी चौकातून विद्यापीठ चौकापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

पीएमपी बसचा बेशिस्तपणा…
गणेशखिंड रस्त्यावर अगोदरच वाहतूक कोंडी होत आहे. त्यात येथून जाणार्‍या पीएमपीच्या बस वाहतूक कोंडीत मोठी भर घालत आहेत. पीएमपी बसचालक लेन शिस्तीची ऐशीतैशी करीत सर्रास एकामागे एक चार-पाच बस पळवीत आहेत. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने या मार्गावरील चालकांना शिस्त लावावी व या मार्गावरील बसचे प्रमाण कमी केले, तरच कोंडी आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

बदलाला त्रासून नागरिक रस्त्यावर

विद्यापीठ चौकात करण्यात आलेल्या चक्राकार वाहतूक बदलामुळे होणार्‍या त्रासाला कंटाळून अभिमानश्री, भुवनेश्वर सोसायटीतील नागरिकांनी सोमवारी (दि. 13) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. माजी नगरसेविका अर्चना मुसळे, त्यांचे पती अ‍ॅड. मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात पन्नास ते साठ रहिवासी सहभागी झाले होते.

जगणे अवघड झाले…
अ‍ॅड. मधुकर मुसळे म्हणाले की, येथील नागरिकांना जगू द्या, संपूर्ण ट्रॅफिकचे केलेले नियोजन चुकीचे आहे. पूर्वी बाणेर रोडची, पाषाण रोडची वाहतूक अभिमानश्रीला वळवली. त्याचबरोबर आता गणेशखिंडची वाहतूक येथूनच वळवली. त्यामुळे या परिसरात परिस्थिती गंभीर झाली आहे. नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना रस्ता ओलांडने सोडाच, घरात शांत बसता येत नाही. दिवसभर वाहनांचा गोंगाट असतो. त्यामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे.

चुकीचा वाहतूक बदल
सेकंदा-सेकंदाला वीस-वीस वाहने येथून वाहतात. हा वाहतूक बदल अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. याबाबत स्थानक नागरिकांचे म्हणणे विचारात घेतले नाही. या रस्त्यावर इतरही काही पर्यायी मार्ग होते. त्याचा विचार केला नाही. नागरिकांनी त्यांची मते मांडली, तर केवळ वरिष्ठांना कळवू, असे सांगितले जाते. त्यांनी लेखी दिले, तर त्याचा विचार केला जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *