महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ फेब्रुवारी । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं.यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेत पडलेली फूट या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यासंदर्भात देखील निर्णय घेतला जाऊ शकतो.
दरम्यान ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारी म्हणजेच पासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे.
सुनावणी पाच सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे, ज्यामध्ये सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एम.आर. शहा, न्या.कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस नार्सिंमा यांचा समावेश आहे.
या मुद्द्यांवर होणार युक्तीवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आज युक्तीवाद होऊ शकतो, तसेच राज्यघटनेतील अनुसूची १० मधील तरतुदींची व्यप्ती, राज्यपालांकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना दिलेलं निमंत्रण, विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांची निवड या मुद्द्यावर आज युक्तिवाद होईल.