खवय्यांची पसंती असलेल्या हापूस आंब्यांचे पुण्यात आगमन ; नियमित हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । खवय्यांची पसंती असलेल्या हापूस आंब्याचे पुण्यात आगमन झाले आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक सुरू झाली असून, कोकणातून दररोज १० ते १५ पेट्यांची आवक होत आहे. हापूस आंब्यांचा हंगाम नियमित सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

हापूस आंब्यांची आवक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. सध्या फळ बाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक होत असून, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हापूसची आवक वाढून दर सामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील हापूस आंब्यांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

मंगळवारी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर हापूस आंब्यांच्या पाच डझनाच्या सहा पेट्यांची आवक झाली. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील आंबा बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतून आंब्यांच्या पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या. आंब्यांच्या पेट्यांचा लिलाव झाला. पाच डझनाच्या एका पेटीला २१ हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. व्यापारी युवराज काची यांनी आंब्याच्या पेटीची खरेदी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते पेट्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी तरकारी विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, फळ विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, माजी उपाध्यक्ष अमोल घुले, गणेश यादव आदी या वेळी उपस्थित होते.

यंदा हापूस आंबा लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. फळधारणा चांगली झाली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्यांची नियमित आवक सुरू होईल, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *