महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यावर मनसे आता काय प्रतिक्रिया व्यक्त करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. जगताप यांच्या या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.