महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । हल्ली महिलांमध्ये पाळीच्या समस्या, त्यामुळे होणारा त्रास, अतीरक्तस्राव, PCOD प्रॉब्लेम अशा त्रासाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. यामागे मुख्यकारण हे महिलांच्या कामाचं बदलेलं स्वरुप आणि चुकीची लाइफस्टाइल असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.आता सगळ्याच क्षेत्रात डिजीटायझेशन झालं आहे. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे शारीरिक श्रम कमी होऊन मानसिक श्रम वाढले आहेत. शिवाय तासन् तास एकाच जागी बसून काम करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. महिलांच्या दृष्टीने ऑफीस वर्क जास्त फायद्याचं असं म्हटलं जात होतं. पण याच तासन् तास एकाच जागी बसून काम करण्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत.
कामाचे ८ ते १० तास एकाच जागी सलग बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, कामाचा आणि इतरही वाढते ताण, सकस आहाराची कमतरता या सगळ्याचा स्त्रियांच्या शरीरावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहेत.
काय असते हे फायब्रॉइड?
अशा गाठी साधारण ३० ते ५० वयोगटाच्या महिलांमध्ये अधिक दिसतात. वयाच्या पन्नाशीला पोहोचेपर्यंत युटेरियन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात गाठी होणार्या स्त्रियांचं प्रमाण मोठं आहे. प्रसुतीच्या काळात गर्भाशयामध्ये विशिष्ट तर्हेची स्नायूंची गाठ किंवा गाठी होतात त्याला फ्रायब्रॉइड किंवा लियोमायोमस/ मायोमस असंही म्हणतात.
यामागची कारणं
आजवर याची कारणं ठामपणे कोणालाही सांगता आलेली नाहीत. पण शरीरात पुढील बदल झाल्याने हे उद्भवू शकतात.
संप्रेरकांमधील बदल (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण)
वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ, उदा. इन्सुलिनचं प्रमाण
अनुवांशिकता
इसीएम (एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स)
लक्षणं?
गाठी कुठं नि किती आहेत, त्यांचा आकार केवढा आहे यावर लक्षणं अवलंबून आहेत. काही स्त्रियांमध्ये तर लक्षणं आढळतंच नाहीत. तरीही बहुतांश स्त्रियांना जाणवणारी लक्षणं अशा आहेत.
मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव व प्रचंड वेदना
कंबरदुखी नि पायांमध्ये वेदना
मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वाढ
बद्धकोष्ठता
ओटीपोटात भरून येणं
वंध्यत्व
शस्त्रक्रियेचा निर्णय कधी घ्यावा?
हल्ली अनेक प्रगत उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आहेत. कर्करोग वगळता सर्वच आजारांसाठी अन्य (Altemate) उपचारपद्धती भारतात उपलब्ध आहेत. स्त्रीच्या त्रासाचे प्रमाण, आजाराचे गांभीर्य, तिच्या मनाची तयारी, शरीराची तंदुरुस्ती (Fitness) इत्यादी घटकांचा विचार करून शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा लागतो.
तरीही गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे उपयुक्त ठरते.