महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । घरातून पळून येऊन आणि सात जन्माची साथ देण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमविरांसाठी आळंदी देवाची हे हक्काचे ठिकाण बनले आहे. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात हजारो प्रेमविरांचे लग्न आळंदीत लागल्याने ”प्रेमविवाह करायचा तर आळंदीतच” हेच बिरुद तयार झाले. यामुळे आजच्या मुहूर्तावर ऐंशीहून अधिक प्रेमविवाह करत प्रेमविरांनी आपापला व्हॅलेंटाइन डे साजरा केला.
प्रेमविवाहाबरोबरच घरच्यांच्या उपस्थितीत ठरवून झालेले विवाहही तेवढ्याच प्रमाणात होतात. आळंदी शहरात तीनशेहून अधिक ठिकाणी लग्न सोहळा चालतात. यामध्ये घरच्यांच्या संमतीने वाजतगाजत तर घरच्यांच्या विना संमतीने पळून येत लपून छपूनही विवाह मोठ्या प्रमाणात चालतात. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लग्ने होतात. यावर आळंदीतील मंगलकार्यालये तसेच अनेक कुटुंबांचा उदर निर्वाह चालतो.
व्हॅलेंटाइन डेला लग्न करायचे ठरवून आलेले प्रेमवीर लग्न लावून कार्यालयाकडून सर्टिफिकेट मिळवितात व पुन्हा माघारी जातात. लग्नासाठी लागणारे तीन साथीदार, वय पूर्णत्वाचा पुरावा, छायाचित्र, आधारकार्ड आदींची तयारी करूनच प्रेमवीर आळंदीत दाखल होतात. दोन हजार रुपयांपासून दहा पंधरा हजार रुपयांत नुसते लग्न लावून दिले जाते.