महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । समृद्धी महामार्गावर गेल्या दोन दिवसांत आज दुसरा अपघात झाला असून, यात एका महिलेसह दोनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून, गाडीतील एअरबॅग उघडूनही दोनजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजेश राजाराम रहाटे (वय 52), अलका वझुलकर (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. लीना राजेश रहाटे (वय 18) व अवंतिका वझुलकर (वय 16) या दोन तरुणी जखमी आहेत.
नागपूरमधील राजेश रहाटे हे आपली मुलगी लीना, भाची अवंतिका आणि मेहुणी अलका यांच्यासोबत वैद्यकिय कारणासाठी नाशिकला जात होते. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात त्यांच्या भरधाव कारचा डाव्या बाजूचा समोरील टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली ती कार दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दोन्ही एअरबॅग उघडूनही या अपघातात राजेश रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अलका वझुलकर यांचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, लीना रहाटे व अवंतिका वझुलकर या दोन तरुणी जखमी असून, त्यांच्यावर कोपरगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका आणि एमएसएफचे जवान मदतीसाठी पोहोचले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
समृद्धी महामार्ग खुला झाल्यापासून अनेक अपघात या महामार्गावर घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरगावच्या शिर्डी इंटरचेंजजवळ एक भरधाव कार संरक्षण कठडय़ावर चढली होती. या अपघातात वाहनात असलेला चालक बालंबाल बचावला होता.