प्रमोद महाजन यांनी शिवसेनेविषयी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपलेली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे गटाचा उल्लेख चोर असा केला. या सगळ्या दरम्यान काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांनी एक भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली आहे अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी २० वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांना शिवसेना आणि भाजपा बाबत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रमोद महाजन यांनी एक भाकीत केलं होतं. तेच भाकित आज खरं ठरलं आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हटलं आहे राजदीप सरदेसाई यांनी?
देशात अटलबिहारी वाजपेयीचं सरकार होतं. त्या काळात मुंबईचे शेरीफ नाना चुडासमा होते. त्यांच्या घरी एक पार्टी होती. प्रमोद हे मंत्रिमंडळातलं मोठं नाव होतं. मी त्या पार्टीत असताना प्रमोद महाजन यांना विचारलं की दिल्लीत तुम्ही क्रमांक एकचा पक्ष आहात आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवत आहात पण महाराष्ट्रात तुम्ही लहान भाऊ आहात. तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यावर प्रमोद महाजन मला म्हणाले की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल. गेल्या आठ वर्षात भाजपाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी केलेलं भाकित खरं ठरलं आहे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत राजदीप सरदेसाई यांनी ही आठवण सांगितली आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपा आणि शिवसेनेची महाराष्ट्रात युती झाली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना या युतीचे शिल्पकार मानलं जात होतं. मात्र २०१४ ला पहिल्यांदा युती तुटली. त्यानंतर २०१९ ला काय झालं ते आपल्याला माहित आहेच. आता प्रमोद महाजन यांच्या त्या वक्तव्याची चर्चा होते आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात बंड केलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपल्यामागे महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आता महाराष्ट्रात भाजपा मोठा भाऊ आहे हे दिसून येतं आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *