महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) दिल्ली कसोटीतून बाहेर पडला आहे. वॉर्नरच्या डोक्याला मार लागला, त्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. शुक्रवारी (दि.17) फलंदाजीदरम्यान मोहम्मद सिराजचे दोन धोकादायक बाउन्सर वॉर्नरच्या अंगावर आदळले होते. पहिल्या बाऊन्सरने त्याच्या हाताला, तर दुसरा उसळता चेंडू डोक्याला लागला होता. परिणामी दुखापतीमुळे वॉर्नर (David Warner) पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता.
कांगारू संघात ‘या’ खेळाडूची एंट्री
वॉर्नर (David Warner) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडल्याने त्याच्या जागी कंसशन प्लेअरचा समावेश करण्यात आला आहे. मॅट रेनशॉ आता शनिवारी कंसशन प्लेअर म्हणून मैदानात उतरेल. वॉर्नरने पहिल्या डावात 44 चेंडूंचा सामना करताना 3 चौकारांसह 15 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 50 असताना 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती झेलबाद केले. पहिल्या कसोटीत तो स्वस्तात बाद झाला होता. नागपुरात त्याने पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 10 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर आटोपला
ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब वगळता पाहुण्या संघाच्या कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर टीकाव लागला नाही. ख्वाजाने 125 चेंडूत 81 धावा केल्या तर हँड्सकॉम्बने 142 चेंडूत 72 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 78.4 षटकात 263 धावांवर आटोपला. भारताकडून शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 कांगारू खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.