महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियंत्रण मान्य केले. या प्रक्रियेतून शिवसेनेचे नवीन रूप पुढे आले आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. याचे एक कारण संख्याशास्त्रीय आहे आणि दुसरे कारण समाजशास्त्रीय आहे. आयोगाच्या दूरगामी निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे जे आमदार, खासदार आहेत, त्यांना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा व्हिप जारी होणार आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे संघटना बांधणी आणि नवे निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडील पंधरा-सोळा विधानसभा सदस्यांच्या पुढे नवीन आव्हाने उभे राहिली आहेत. कारण 27 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पंधरा-सोळा आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या नियंत्रणाखालील नव शिवसेना पक्षाने काढलेले व्हिप पाळावे लागतील. जर त्यांनी नव शिवसेना पक्षाचे व्हिप पाळले नाहीत तर त्यांच्यावर अपात्रतेची वेळ येण्याची शक्यता आहे. म्हणजेच थोडक्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाने आत्ता निर्णायक वळण घेतलेले दिसते. या वळणावर नव शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीचा प्रयोग सुरू झालेला आहे. हा प्रयोग गेल्या वर्षीच सुरू झाला होता. त्यास योग्य म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली दिसते. याचा दुसरा अर्थ महाविकास आघाडीचा प्रयोग जुन्या शिवसेनेचा होता. नव शिवसेनेचा प्रयोग भाजप पक्षाबरोबर राहून चौखांबी यंत्रणा राबविण्याचा दिसतो.